सोलापूर : राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल फाउंडेशनच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सुभाष बापूनी हजारों मुलींचे कन्यादान केले आहे. त्यामुळे हजारो जावयांचे ते सासरे समजले जातात. या जावयांमध्ये अनेक राजकीय नेते, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे हे पूर्वी सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जात होते, जुळे सोलापुर भागातून नरेंद्र काळे हे 2012 ते 2017 दरम्यान नगरसेवक झाले, यावेळी महापालिकेवर विरोधी पक्षनेते पदाचा मान काळे यांना मिळाला.
2014 साली राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, सोलापूरच्या पालकमंत्री पदावर विजयकुमार देशमुख यांना पक्षाने संधी दिली त्यामुळे अनेक भाजपचे कार्यकर्ते, नगरसेवक देशमुख मालकांच्या संपर्कात गेले. यामध्ये नरेंद्र काळे यांचाही समावेश होता. भाजपमधील देशमुख गटबाजी अनेकांच्या अडचणीची ठरली होती, त्यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्यांचे नुकसान झाले. नरेंद्र काळे यांची विजयकुमार देशमुख यांची जवळीक वाढली त्याचा फटका मात्र 2017 सालच्या महापालिका निवडणुकीत बसला.
बापूंच्या जवळ असलेल्या काळे यांना महापालिकेचे तिकीट मिळाले नाही. 2017 एकदा भेटण्यासाठी काळे हे बापूंच्या निवासस्थानी गेले होते, तरीही बापूनी त्यांना तिकीट दिले नाही, नंतर त्यांनी बापूंपासून दुरावा ठेवला होता. बरेच वर्ष नरेंद्र काळे हे राजकारणापासून दूरच दिसून आले.
दरम्यान भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष पदी नरेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल नरेंद्र काळे यांचा आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या कार्यालयात सत्कार करत पेढे भरवले हा फोटो वायरल झाला मात्र या निवडीबद्दल दुसरा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला तो म्हणजे आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतः नरेंद्र काळे यांना आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांचा आपले चिरंजीव मनीष देशमुख यांच्या हस्ते सत्कार घडवून आणला. तब्बल पाच वर्षानंतर नरेंद्र काळे हे बापूंच्या निवासस्थानी गेले. हा फोटो आणि ही भेट सध्या चर्चेचा विषय झाला आहे.


















