सोलापूर (सिंहासन) : ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले (Global Teacher Ranjit Disale) हे प्राथमिक शिक्षण विभागानी केलेल्या चौकशी मध्ये कारवाईच्या कचाटयात आडकले आहेत. चौकशी अहवाल अंतीम टप्यात आला असून कारवाईसाठी सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. अशी माहीती प्राथमिक शिक्षणधिकारी डॉ.किरण लोहार यांनी दिली.
किरण लोहार म्हणाले, रणजीत डिसले यांना वेळापूर येथील डाएट प्रशिक्षण केंद्रात प्रतिनियुक्तीवर नियुक्ती होती, त्याठिकाणी ते मागील ३ वर्षांपासून गैरहजर आहेत, तसा रिपोर्ट संबंधित प्राचार्यांचा आहे. डिसले यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला ही आनंदाची बाब आहे, तरी त्याचा त्यांच्या शाळेला काही फायदा झालाय असे मला वाटत नाही. तीन वर्षांपासून गैरहजर असताना फायदा होईल तरी कसा? असा प्रश्न शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी उपस्थित केला आहे.गुरुवारी एका अर्जावर सही घेण्यासाठी डिसले आले होते, मात्र त्यासाठीच्या कायदेशीर बाबींची पूर्तता त्यांनी केली नव्हती. परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र , संबंधित परदेशी विद्यापीठाचे माहितीपत्रक देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी अशी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. दीड महिन्यांपूर्वी अर्ज सादर केला होता, अर्ज केला होता तर स्वतः परस्पर सही घेण्यासाठी का आले होते? त्यामुळे डिसले गुरुजींचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. दोन वर्षे प्रतिनियुक्तीवर असणारा माणूस तीन वर्षे कसं काय गैरहजर राहू शकतो? डिसले यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय कमिटी नेमलेली होती, त्याचा अहवाल या कार्यालयाला प्राप्त झालेला आहे. त्यावर आमचं काम सुरू आहे. त्यांच्यावर कायदेशीररित्या जी काही कार्यवाही करणे गरजेचे आहे ती केली जाईल, असे डॉ. किरण लोहार यांनी सांगितले. दरम्यान काय म्हणाले लोहार पहा….
डिसले गुरुजी काय म्हणाले?
या संदर्भात जिल्हा परिषदेकडून अद्याप कोणताही लेखी आदेश मला मिळालेले नाहीत. लेखी आदेश आल्यानंतर भूमिका स्पष्ट करू, अशी प्रतिक्रिया डॉ. रणजितसिंह डिसले यांनी दिली.


















