अक्कलकोट : तालुक्यातील संगोगी या गावांमध्ये सन 2021 या वर्षात मार्च ते डिसेंबर या दहा महिन्यात एक ही ग्रामपंचायतची मासिक सभा घेतली गेली नाही अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य शंकर हर्डीकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. ते मागील पाच महिन्यापासून अक्कलकोट पंचायत समितीकडे चौकशी करण्यासाठी तक्रार करत आहेत मात्र यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. ग्रामपंचायत सदस्य शंकर हर्डीकर यांनी जुलै महिन्यात पंचायत समितीकडे पहिली तक्रार केली होती. त्यावेळच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे हर्डीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तेव्हा जिल्हा प्रशासनाकडून उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला 9 जुलै 2021 रोजी पत्र देण्यात आले या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना या पत्रात करण्यात आल्या.
27 जुलै रोजी ग्रामपंचायत विभागाच्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समितीला याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. या पत्रानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी पंचायत बी एस तुळजापूरे यांना 9 जुलै 2021 व 14 सप्टेंबर 2021 चौकशी करण्याच्या आदेश दिले मात्र त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही.
तुळजापूरे यांच्या कडून कोणताही अहवाल न आल्याने विस्तार अधिकारी पंचायत एस जी घुगरे यांना चौकशी करण्याचे आदेश 10 नोव्हेंबर 2021 रोजी देण्यात आले होते. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर शंकर हर्डीकर यांनी 10 जानेवारी 2022 रोजी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे, यामध्ये कलम 36 नुसार ग्रामपंचायत मासिक सभा बैठक न घेतल्यास या कलमान्वये सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचे पद अपात्र ठरवावे अशी मागणी केली आहे.


















