सोलापूर : रस्त्यावर वाढदिवस साजरा करून गर्दी करणे महागात पडले असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राज्याचे नेते राजाभाऊ सरवदे यांचे चिरंजीव सुशील राजाभाऊ सरवदे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. प्रशिक सामाजिक संस्थेचे संस्थापक सुशील सरवदे यांचा 31 जानेवारी रोजी वाढदिवस होता, राजाभाऊ सरवदे यांचे ते चिरंजीव असल्याने त्यांची सोलापुरात मोठी क्रेझ आहे. रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर विविध सामाजिक उपक्रम शहरात राबवून वाढदिवसाचा उत्साह वाढवला. भावी नगरसेवक म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे. वाढदिवसाच्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास मिलिंद नगर बुधवार पेठ येथे वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी जंगी सत्कार केला. या सत्काराला मोठी गर्दी झाली. विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी स्टेज मारून मोठया आवाजाचा डॉल्बी लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला यामुळे फौजदार चावडी पोलिसांनी कलम 188, 341 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.















