सोलापूर : जिल्हा परिषदेची ऑनलाइन सभा गोंधळामध्ये तहकूब करण्यात आली. मात्र या सभेत जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या 40 टक्के वाढीव निधी खर्चास एकमताने मान्यता देण्यात आली. येणाऱ्या बुधवारी दोन टप्प्यांमध्ये तालुकानिहाय आढावा घेण्याचे यावेळी ठरले.
सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन ऐवजी ऑफलाइन घेण्यासाठी बरेच सदस्य आणि सभापती आक्रमक झाले होते. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ऑनलाइन सभेची सर्व तयारी केली होती. सभाही ऑफलाईन घेण्यासाठी अनेक सदस्य आक्रमक दिसून आले मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयात बराच गोंधळ झाला अध्यक्षांना घेराव घालण्यात आला मात्र शेवटी अध्यक्षांनी ऑनलाइन सभा सुरू केली.
परंतु ऑनलाइन सभेमध्ये कुणाचा कुणाला मेळ दिसेना कोणीही मध्ये बोलू लागले, सभापती अनिल मोटे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवा अशी मागणी केली. सदस्य एडवोकेट सचिन देशमुख, सुभाष माने, मल्लिकार्जुन पाटील, वसंत नाना देशमुख, भारत शिंदे, आनंद तानवडे, मदन दराडे, नितीन नकाते यांनी आयत्या वेळच्या विषयांना विरोध केला. ऑनलाइन सभेवर सर्वांनीच नाराजी व्यक्त केली यामध्ये ऑनलाइन जॉईन झालेल्या शैला गोडसे, रेखा राऊत, ज्योती पाटील ,स्वाती कांबळे, सभापती प्रेरणा मासाळ, रत्नमाला पोतदार यांनी तीव्र विरोध दर्शवला, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रमोशन चालू आहे, अधिकाऱ्यांच्या बैठका चालू आहेत, मग 100 लोकांची सभा चालत नाही का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
सभा तहकूब करण्याची एकमुखी मागणी झाली आणि आढावा बैठका घेऊन पुढील ऑनलाइन जीबी घ्यावी अशी मागणी पुढे आली. शेवटी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या 40 टक्के वाढीव निधी खर्चास एकमताने मंजुरी देत ही सभा तहकूब केली. येणाऱ्या बुधवारी दोन टप्प्यांमध्ये 11 तालुक्यांचा आढावा घेण्यात यावा असे ठरले .
















