सोलापूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने राबवलेल्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याध्यापक शिक्षकांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. या अभियानात अतिशय सुंदर असे काम केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे अजितदादांनी मनापासून कौतुक केले.
एकीकडे असे वातावरण असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे विद्यमान विरोधी पक्षनेते काका साठे यांचा या कार्यक्रमात अवमान झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. एक तर काका साठे या कार्यक्रमाला उशिरा आले, दुसरीकडे त्यांना एका कोपऱ्यात बसवण्यात आले होते, त्यांचा सत्कार वेळेवर केला गेला नाही, ते मधूनच उठून चालले होते, तेव्हा काही पत्रकारांनी काका चालले बघा असे सांगितल्यावर प्रशासनाला जाग आली. त्यांनी काकांना थांबवून त्यांच्या हस्ते एका शाळेला पुरस्कार देण्याची धडपड दाखवली.
दरम्यान गुरुवारी विरोधी पक्षनेते काका साठे हे आपल्या कार्यालयात बसले होते. पत्रकारांनी त्यांना सभागृहात झालेल्या कार्यक्रमाबद्दल विचारले. तुम्ही उशीरा का आलात? तुम्हाला या कार्यक्रमाची निमंत्रण नव्हते का? असे प्रश्न केले असता मला तर काहीच माहित नव्हते, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणतीही निमंत्रण दिले नाही. मी भेटायला गेल्या नंतर समजले की, माझ्या एका तालुका अध्यक्षाला सीईओ स्वामी यांनी काका साठे यांना निमंत्रण द्या असे मला समजले , परंतू, त्याने काहीच सांगितले नाही. मला निमंत्रण नसल्याने मी माझ्या कार्यालयात बराच वेळ बसून होतो, शेवटी शिक्षणाधिकारी यांनी विनंती केल्यानंतर मी सभागृहात गेलो, असे काका साठे यांनी सांगितले.
काका साठे पेक्षा सीईओंच्या जवळ गेलेला हा तालुका अध्यक्ष कोण? अशी चर्चा पत्रकारांमध्ये सुरू झाली आहे. प्रशासनाने हा कार्यक्रम ठराविकांच्या उपस्थितीत ठेवण्याचे नियोजन केले होते. मात्र काका साठे हे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत असे असताना स्वामी यांनी काकांना स्वतः निमंत्रण द्यायला हवे होते पण त्यांनी एका तालुकाध्यक्षाच्यामार्फत सांगण्यास लावले यामागील ‘गोम’ अजून समजलेली नाही तो तालुका अध्यक्ष कोण? सीईओ स्वामी यांच्याजवळ ते अध्यक्ष कसे गेले? कोणाच्या मार्फत जवळीक साधली गेली. याची उत्तरे लवकरच बाहेर येतील.














