सोलापूर : मुंबई-पुण्याच्या चकरा बंद करा, उगीच नेत्यांची कान भरायची कामे बंद करा, लोकांत जाऊन कामे करा, आजची परिस्थिती पाहता जिल्ह्यात खुप काम करणे गरजेचे आहे अन्यथा प्रमुख पदाधिकाऱ्यांना घराचा रस्ता दाखवेन असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भरला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी!’ या संवाद अभियान अंतर्गत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष काका साठे, कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, दीपक साळुंखे पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मोहम्मद शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, जिल्हा निरीक्षक सुरेश घुले, कल्याणराव काळे, महिला जिल्हाध्यक्ष ऍड सुप्रिया गुंड, यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांना जयंत पाटलांनी कुणी भाषण करायचे नाही, काका सांगतील तो आदेश राहील अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्हयाचे कार्य, महिला आघाडीची वाटचाल, ओबीसी सेलचे कार्य, युवकचे कार्य, युवती आघाडीचे कार्य, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे कामकाज, अनुसूचित जाती विभागाचे काम, सोशल मीडियाचे काम त्यांनी जाणून घेतले, केलेले आंदोलने , बैठका, कार्यकारिणी निवड, तालुकाध्यक्ष निवडी, शाखा उद्घाटन याची माहिती त्यांनी घेतली. यावेळी मीडिया सेलचे अध्यक्ष मिलिंद गोरे यांनी माहिती देताना जयंत पाटलांनी तालुक्यात आणि जिल्हा परिषद मतदारसंघात मीडिया सेलचे अध्यक्ष आहेत का असा प्रश्न केला त्यावर अद्यापही नेमणूक झाली नसल्याचे निदर्शनास आले यावेळी त्यांनी अरे तुमचे तालुक्यात सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष नाहीत, काय चाललंय हे अशा शब्दात संताप व्यक्त केला.
2029 सालच्या निवडणुकीच्या दृष्टीने युवक, विद्यार्थी फळी मजबूत करा, हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे भावी नेते आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शाखा नेमण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अनेक नेते या बैठकीला हजर नव्हते, अनेकांना मॅसेज दिले नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

















