सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा जाहीर केला. त्यावर 15 दिवस हरकती व सूचना मागविण्यात आल्या. 14 फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंत एकूण 108 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 103 अर्ज हरकती व सूचनेच्या अनुषंगाने असल्याने व उर्वरित 5 अर्ज हे सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत. या प्राप्त 108 अर्जावर राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून नियोजन भवन येथे प्राप्त हरकती व सूचनावर सुनावणी घेण्यात आली.
त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेले अधिकारी सचिंद्र प्रताप सिंग आयुक्त पशुसंवर्धन विभाग पुणे विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीमती नंदिनी आवडे तर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पि.शिवशंकर, अतुल जाधव, अव्वर सचिव राज्य निवडणूक आयोग, प्रदीप परब ,कक्षाधिकारी राज्य निवडणूक आयोग, अतिरीक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांची या सुनावणीला उपस्थिती होती.
नियोजन भवन प्रवेशद्वार समोर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महापालिकेच्या वतीने प्रत्येक एक तासाचे टप्पे करण्यात आले होते, त्याप्रमाणे हरकत घेतल्याची नावाप्रमाणे पुकारून आत घेतले गेले. काहींनी आपल्या सोबत वकील आणले होते.
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, काँग्रेस नेते बसवराज म्हेत्रे, नगरसेवक नरसिंग कोळी, नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शिवसेनेचे लहू गायकवाड, नगरसेविका मीनाक्षी कंपली, भाजपचे नागेश क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सनी म्हेत्रे, अजित बनसोडे, योगेश पवार, शिवसेनेचे नाना मस्के, माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह अनेक तक्रारदार आणि त्यांच्यासोबत वकिलांची गर्दी होती.
दरम्यान या हरकती व सुचनेवेळी एकूण 35 ग्रुप तयार करण्यात आले होते.त्यापैकी 33 ग्रुप उपस्थिती होते. तर 2 ग्रुप अनुपस्थित होते. एकूण 108 हरकती व सूचनेच्या अर्जा पैकी 84 अर्जदार यावेळी उपस्थित होते. यावेळी या सर्वांचे हरकती व सूचना राज्य निवडणूक आयोगाने सुनावणी घेतली असून महापालिकेच्या वतीने अंतिम हरकती व सूचना येत्या 2 मार्च 2022 रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.अशी माहिती यावेळी देण्यात आली.
















