सोलापूर : राजा शिवछत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल कोशारी यांचा निषेध करण्यात येणार होता.
पोलिसांनी आसूड मारू न दिल्याने व आणलेले बॅनर जप्त करत असताना पुरुषोत्तम बरडे व पोलीस निरीक्षक उदय पाटील यांच्यात वाद निर्माण झाला. या वेळी वातावरण चिघळले होते, पोलिसांनी तो बॅनर जप्त करून नेला. तेव्हा पोलिसांच्या निषेधार्थ शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलनाला बसले.
जोपर्यंत बॅनर येणार आणत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली. पोलीस निरीक्षक उदय पाटील यांनी हात जोडले मात्र कोणीही ऐकले नाही. या आंदोलनात शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक भारत बडूरवाले, लहू गायकवाड, भीमाशंकर म्हेत्रे, विष्णू कारमपुरी महेश धाराशिवकर, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, नगरसेवक विनोद गायकवाड, प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
दरम्यान जोपर्यंत राज्यपाल भगतसिंग कोशारी हे माफी मागणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यपाल कोषारी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
















