सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अर्थात NRHM च्या कंत्राटी सोलापूर जिल्हा व्यवस्थापक वैशाली थोरात यांचा पदभार बदला अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे.
अध्यक्ष कांबळे यांनी गुरुवारी तसे पत्र सीईओ स्वामी यांना दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष कांबळे यांनी दिलेल्या पत्रामध्ये, राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कंत्राटी जिल्हा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्या गेल्या १० वर्षाच्या कारभाराबाबत बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. मानधन, प्रवासभत्ते व पगारबील जाणीवपूर्वक प्रलंबीत ठेवून ठराविक बँकेत रक्कमा डिपॉझिट ठेवून त्यांचे अनेक वर्षे कमिशन खाल्ले असा ठपका ठेवण्यात आला आहे.
ही बातमी प्रसिद्ध होताच वैशाली थोरात या नागेश चौगुले या कंत्राटी कर्मचाऱ्याला घेऊन पळतच सर्व काम सोडून अध्यक्ष कांबळे यांच्या केबिनकडे आल्या. अध्यक्ष नव्हते त्या लगेच उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती दिलीप चव्हाण यांच्याकडे गेल्या. चव्हाण यांना त्यांनी पट्टी पाडली, मी खूप चांगले काम करते. हे कुणीतरी जाणीवपूर्वक केले आहे. शेवटचे 15 दिवस शिल्लक राहीलेल्या चव्हाण यांना तेवढेच हवे होते, त्यांनी अध्यक्ष कांबळे अण्णांनी मला न विचारता पत्र कसे दिले? वैशाली थोरात खूप चांगले काम करतात म्हणून त्यांनी मी पण सीईओ यांना पत्र देतो म्हणून पत्रकारांना सांगितले.
शुक्रवारी दिवसभर वैशाली थोरात या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष चव्हाण यांच्या चेंबरमध्ये ठिय्या मांडून होत्या.त्यांना दिवसभर कुणीच कसे विचारले नाही हे विशेष होते. उपाध्यक्ष चव्हाण यांनी सीईओ स्वामी यांना पत्र देऊन थोरात यांचा चार्ज काढू नये असे पत्र दिले असे सांगण्यात आले.
थोरात यांनी अध्यक्ष कांबळे यांची पण अँटीचेंबरमध्ये भेट घेतली. तेव्हा थोरात सोबत दुसरीच कुणी व्यक्ती होती. अध्यक्ष आपल्या पत्रावर ठाम दिसून आले. थोरात यांच्या सोबत आलेल्या DPM कडे अध्यक्षांचे कोरे लेटरपॅड दिसून आले हे कोड्यात टाकणारे होते. या महिला कंत्राटी अधिकाऱ्यावरून बिचाऱ्या अध्यक्ष-उपाध्यक्ष मध्ये वाद निर्माण झाला आहे. अजून या प्रकरणात कोण कोण इंटरफेअर करतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

















