सोलापूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी नेत्यांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे मध्यवर्ती उत्सव समितीच्या विरोधात मध्यवर्ती महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या दोन्ही मध्यवर्ती मध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान मंगळवारी मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली.
सरकार परवानगी देऊन अथवा न देवो, भीम जयंती मिरवणूक निघणारच यावर सर्वानुमते 31 मार्च रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे विश्वस्त राहुल सरवदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची बैठक 31 मार्च 2022 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल फॉरेस्ट येथे होणार असून या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विश्वस्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी विश्वस्त समितीचे राहुल सरवदे यांनी रोखठोक भूमिका मांडली. जयंतीनिमित्त दोन महामंडळे नाहीत. सर्व निळे झेंडेवाले एकत्रच आहेत. ज्यांच्या डोक्यावर निळा झेंडा नाही, त्यांचे मालक वेगळे आहेत असे एजंट महामंडळात एकत्र आले आहेत. महामंडळात गेलेल्यांचे मालक वेगळे आहेत. ते गांधीवादी आहेत.अशी घणाघाती टीका केली. आम्ही सगळे आंबेडकरवादी आहोत. मिरवणूक एकच निघणार सरकार परवानगी देऊ अथवा न देवो या संदर्भात या मिटिंग मध्ये शिक्कामोर्तब होईल अशी भूमिका राहुल सरवदे यांनी यावेळी मांडली.
ज्यांनी मागील एका जयंती मिरवणूकीला गालबोट लावलं, डॉक्टर आंबेडकर जयंती मिरवणुकीत कधी लाठीचार्ज झाला नव्हता, पण ज्या माणसामुळे झाला तो तिकडे पदाधिकारी होतो. लाठीचार्ज झाल्यावर काही जण पळून गेले. ते आज नेतृत्व करायला निघाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला तेव्हाच जागे केले तुम्ही काय आता जागे करणार असा सवाल विश्वस्त समितीचे राजाभाऊ सरवदे यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, 31 मार्च रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या बैठकीला तमाम समाज बांधवांनी व मंडळ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी विश्वस्त समितीने केले. या पत्रकार परिषदेत सुभानजी बनसोडे , सुबोध वाघमोडे, प्रवीण निकाळजे , एडवोकेट संजीव सदाफुले, राजा कदम, शशि कांबळे, अतुल नागटिळक, राजरत्न फडतरे, अजित गायकवाड , बबलू गायकवाड यांच्यासह विश्वस्त समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


















