मोहोळ : दहा ते पंधरा वर्षापासून मोहोळ शहरामधील नागरिकांना केसरी कार्डवर प्राधान्य कुटुंब यादीत नसल्याने धान्य मिळत नाही व त्यामुळे नागरिकांची उपासमार होत आहे. आशा मोहोळ शहरातील धान्यापासून वंचित असलेल्या तब्बल सहाशे कुटुंबियांसोबत मोहोळ शिवसेनेच्या माजी नगरसेविका सीमा पाटील यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तसेच मोहोळ तहसीलदार यांना यासंदर्भात वेळोवेळी निवेदन पाठवले होते, यावर कोणताही निर्णय झाला नाही.
मोहोळ शहरात 2011 च्या लोकसंख्येनुसार शहरी भागासाठी ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार शहरातील काही लाभार्थी अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत येत आहेत, सध्या मोहोळ शहरामध्ये अंत्योदय (A.A.Y.) व अन्नसुरक्षा (R.H.H.) या कार्डधारकांना धान्य वितरीत होत आहे, परंतु प्राधान्य कुटुंब यादीत नसलेल्या मोहोळ शहरातील केशरी शिधापत्रिका कुटुंबधारक असलेल्या नागरिकांना सध्याच्या काळात रेशनवर धान्य मिळत नाही. यामुळे या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे. याचा विचार करून सीमा पाटील यांनी घेतलेल्या शिबिरात प्राधान्य कुटुंब यादीत नसलेले सुमारे 560 कुटुंब प्रमुखांनी आपले अर्ज सादर केले, 560 कुटुंबाची अंदाजे लाभार्थी लोकसंख्या 3300 असून सदर केसरी शिधापत्रिका कुटुंब धारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे व विशेष इष्टांक व धान्य वाढवून शासनामार्फत त्वरित प्रत्येक केसरी कार्डधारकांना कायमस्वरूपी धान्य देण्यात यावे अन्यथा लाभार्थ्यास सह लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या मोर्चातून सीमा पाटील यांनी दिला.
उपजिल्हा प्रमुख दादासाहेब पवार, शिवसेना शहर संघटक रणजीत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवरत्न गायकवाड, मुख्याध्यापक विष्णू मस्के, युवा सेना तालुका प्रमुख राजरत्न गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड, किसन केवळे, संतोष माळी, हैदर इनामदार, सोमा पोळ, योगेश लेंगरे, गणेश पासले,अभिषेक घुले, सुरज गायकवाड, अलीम बागवान निशांत माळी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.























