सोलापूर : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात जमीन गेलेल्या 3502 प्रकल्पग्रस्तांना सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील 3860 हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील जमिनी वाटप झाल्या.
दरम्यान आता कोयना प्रकल्पग्रस्तांना कोणाला किती जमिनीचे वाटप झाले याची माहिती संकलन करण्याची सुरुवात झाले आहे. त्यामध्ये 3137 प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप झालेच नाही, अशी माहिती समोर आली याबरोबर 1242 लोकांच्या नावे जमीन वाटप झाली परंतु त्यांचे नाव दिसत नाही तसेच 3569 लाभार्थ्यांना जादा वाटप अथवा जमिनीचे दोनदा वाटप प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यानंतर प्रशासनाने नाव नसलेल्या 1242 व डबल अथवा जादा वाटप झालेल्या अशा एकूण 4811 जमिनी मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या सातबाऱ्यावर हस्तांतरण बंदी शेरे मारले आहेत आणि त्यांना नोटीस देण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात जमीन मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांनी येत्या 10 एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा पुनर्वसन शाखेकडे अर्ज करून आपले म्हणणे मांडावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले.



















