सोलापूर : पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सोलापूर शहरातील संपूर्ण पद्मशाली समाजाचे लक्ष लागले होते. रविवारी मावळते अध्यक्ष महेश कोठे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मार्कंडेय मंदिरात संपन्न झाली.
या बैठकीस माजी महापौर जनार्दन कारमपूरी, नरसप्पा इप्पाकायल, रामकृष्ण कोंड्याल, मुरलीधर आरकाल, रामचंद्र जन्नु, तिरुपती परकीपंडला यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुरेश फलमारी यांची ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी फलमारी समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष फलमारी यांनी समाजाचे आभार मानले. माझी निवड तीन वर्षासाठी असून अनेक वर्ष संस्थेत मी काम केल्याने माझ्यावर विश्वास दाखवला या विश्वासाला सार्थ ठरवत समाजाला उंचीवर नेण्याचा मनोदय व्यक्त केला.


















