सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे हदीतील सराईत गुन्हेगार नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे, वय ३२ वर्षे रा. २५५ भीम नगर, सोरेगांव, विजापूर रोड, सोलापूर सध्या रा. ३४१, माणिक यशवंत इंगळे यांच्या घरात भाडयाने, आदित्य नगर विजापूर रोड, सोलापूर यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये दि. २९ जून २०२२ रोजी स्थानबध्द केले आहे. नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे हा मागील अनेक वर्षांपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दहशत व भीती घालून नागरीकांविरुध्द गुन्हेगारी वर्तन केले आहे.
तो स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी व सामान्य नागरीक याना दहशत भीती घालून बाहुबली नगर, नम्रता सोसायटी, विजापूर रोड, डफरीन चौक, लकी चौक, हुतात्मा स्मृती मंदिर, सोरगांव, जूनी मिल कंपाऊन्ड, भिमनगर, यामीनी नगर, आदित्य नगर नक्षत्र नगर, उदय सोसायटी, कंबर तलाव, नालंदा नगर, सुंदरम नगर, संत रोहिदास चौक, बसंत नगर, कोर्णाक नगर, मधुवन जानकी नगर, जुळे सोलापूर, थोबडेवस्ती, जुना देगाव नाका, पोलीस अधिक्षक कार्यालय परिसर, बेन्नुर नगर, रामलाल चौक, ए.जी. पाटील कॉलेज समोर या परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे.
या परिसरात घातक शस्त्रानिशी फिरून जबरी चोरी, घरफोडी, गैरकायद्याची मंडळी जमविणे, दुखापत करणे, खंडणी मागणे, धमकी देणे, गंभीर दुखापत करणे, शस्त्रानिशी फिरून हल्ला करणे, मारामारी करणे, विनयभंग करणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे याने परिसरात दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करून स्वत:स धोकादायक इसम म्हणून सिध्द केले आहे
नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे याचे विरुध्द शहरातील विजापूर नाका, फौजदार चावडी, सदर बझार व एमआयडीसी पोलीस ठाण्यास एकूण २७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे व ०५ अदखलपात्र गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत.
त्यास गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी २०२० मध्ये क ११० (ई) (ग) फो. प्र. सं अधिनियमानुसार व सन २०२१ क. १०७ फौ.प्र.स अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली होती. नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, पुन्हा त्याने सन २०२२ मध्ये अलीकडील काळात फिर्यादीस घातक शस्त्राचा धाक धाकवून मोबाईल चोरीचा गंभीर दुखापत पोहचून गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे. नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे याचे विरुध्द वेळोवेळी कार्यवाही करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही.
त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम, १९८९ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने सोलापूर शहर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची पहिली व या वर्षातील पाचवी कार्यवाही आहे.

















