ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची अर्ज छाननी प्रक्रिया जिल्हा बँकेच्या सभागृहात घेण्यात आली. सर्वांचे लक्ष लागलेल्या सोसायटी मतदारसंघातील 88 अन्वये 232 कोटींची जबाबदारी निश्चित केलेली आहे आणि 110 अ नुसार बँकेचे संचालक मंडळ समितीचे सदस्य असल्याने माजी संचालकांचे अर्ज राखून ठेवण्यात आले होते त्या अर्जावर दुपारी तीन नंतर सुनावणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी हा निकाल राखून ठेवला होता त्यामुळे मंगळवारी सकाळी काय होणार याच्याकडे सर्वांच्या नजरा होत्या जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अंतिम अर्ज मंजूर झालेली यादी बाहेर पडली. त्यामध्ये ज्यांच्या विरोधात 88 आणि 110 अ अंतर्गत जी सुनावणी चालू आहे त्या सर्व उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
यामध्ये माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रशांत परिचारक, बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे, जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल, बबनराव अवताडे, माजी संचालक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नावांचा समावेश आहे.
आता अर्ज नामंजूर झाल्याने या नेत्यांची भूमिका काय राहील याकडे सर्वांच्या नजरा असल्या तरी प्रत्येकांचे मुलं या निवडणुकीत उभे आहेत.
दरम्यान या निवडणुकीत उभे असलेले अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा अक्कलकोट सोसायटी, दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांचा नागरी बँका, विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांचा बार्शी सोसायटी, पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान अवताडे यांचा कृषी पणन व नागरी बँका, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा दुग्ध संस्था तसेच सांगोला आमदार बाबासाहेब देशमुख सांगोला सोसायटी, शहाजी पवार नागरी बँक, मनीष देशमुख नागरी बँक मधून अर्ज मंजूर झाले आहेत.
या निवडणुकीत माजी आमदार राम सातपुते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराजे देशमुख, दूध संघाचे सदस्य रणजितसिंह शिंदे आणि उत्तर मधून बाबासाहेब पाटील यांच्या अर्जावर हरकती होत्या मात्र त्या सर्वांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
जबाबदारी निश्चित करण्यात आलेल्या नेत्यांनी यंदा आपल्या मुलांना या निवडणुकीत उतरवले. त्यात पृथ्वीराज माने, श्रीदीप हसापुरे, शंभूराजे जगताप, बाळराजे पाटील, प्रणव परिचारक, सिद्धेश्वर अवताडे, अर्जुनसिंह मोहिते पाटील, यशवंत शिंदे, रणजित शिंदे, सूर्यदित्य दीपक साळुंखे यांचा समावेश असून रश्मी बागल यांनी आपल्या आई शामल बागल यांची महिला राखीव मधून उमेदवारी भरली आहे. तर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यंदा बंधू खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना मैदानात उतरले आहे.
110 अ या कलमान्वये संचालक मंडळ बरखास्त समितीमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे होते ते पहिल्यांदाच संचालक झाले होते पण त्यांचे अर्ज बाद झाले आहेत. दरम्यान ज्या उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत त्यांना विभागीय सह निबंधक यांच्याकडे अपील करता येते.

















