‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास
सोलापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आली. असे असताना सुद्धा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय कामकाज मनमानी चालत असल्याचे खुद्द अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या नाराजीतून समोर आले आहे.

नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये अध्यक्ष दीपक वैद्य यांनी जिल्हा परिषदेमधील बँकेत ठेवल्या जाणाऱ्या ठेवींवरून सुरुवातीलाच प्रचंड नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. या ठेवी ठेवताना आपणाला विश्वासात न घेतल्याचे त्यांनी सांगत आपण येडा गबाळा वाटतो का? या शब्दात त्यांनी प्रशासनावर नाराज व्यक्त केली. एवढेच नाही तर ते सभेतून उठून जात होते असे आता बोलले जात आहे.

जिल्हा परिषद प्रशासन प्रमुखाच्या कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी या सभेत व्यक्त केली.पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात प्रशासन सदस्यांना विश्वासात घेत नसल्याची नाराजी या सभेत व्यक्त करण्यात आली.

अध्यक्षांनी तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढील दौऱ्यात आपण ही सर्व तक्रार करणार असल्याचा इशारा दिला होता.
या स्थायी समितीच्या सभेची मागील दोन दिवसापासून जिल्हा परिषदेच्या वर्तुळात प्रचंड चर्चा ऐकण्यास मिळत आहे. मागील चार महिन्यात अध्यक्ष दीपक वैद्य यांनी जिल्हा परिषद समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत असल्याचे बोलले जात होते परंतु दीपक वैद्य यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासन प्रमुखाला चांगलाच डोस दिल्याने प्रशासन काहीसे वाटणीवर आल्याचे बोलले जात आहे.

मंगळवारी अध्यक्ष आपल्या चेंबरमध्ये दुपारच्या दरम्यान जेवायला बसले असताना जिल्हा परिषदेचे सीईओ हे त्यांच्या दालनात आले आणि या दोघांनी तासभर समन्वयाचे दोन घास एकमेकांना भरवल्याचे समजते.
अशी चर्चा मागील दीड महिन्यापूर्वी सुद्धा झाली होती पण त्याचा किती उपयोग झाला हा सुद्धा प्रश्न आहे.
यामध्ये आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जातीने लक्ष घालावे आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवावे अशी मागणी ही सदस्यांमधून होत आहे.














