प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही
सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी समरसेनजीत ऊर्फ टिपू प्रमोद गायकवाड यांना त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती अश्विन डी. भोबे यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी हा आदेश दिला.
आरोपीविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात क्राईम नंबर ०१/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांसह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल आहे. यापूर्वी आरोपीने सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर दाखल करण्यात आलेला हा उच्च न्यायालयातील दुसरा जामीन अर्ज होता.
मात्र, या वेळी आरोपीने स्वतःच्या जामिनासाठी नव्हे, तर अल्पवयीन मुलाच्या गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी वडील म्हणून उपस्थित राहण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
आरोपीच्या मुलाला Thalassaemia Major हा आनुवंशिक रक्तविकार आहे. या आजारामुळे मुलाला नियमित रक्त संक्रमणासह सातत्याने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. मुंबईतील नारायण हेल्थच्या SRCC Children’s Hospital येथे मुलासाठी Haploidentical Bone Marrow Transplant करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी पूर्ण १०० टक्के HLA-मॅच्ड डोनर उपलब्ध नसल्याने आरोपीचे वडील म्हणून असलेले नाते महत्त्वाचे ठरले आहे. उपलब्ध वैद्यकीय माहितीनुसार आरोपी स्वतः ५० टक्के HLA-मॅच्ड म्हणजेच haploidentical डोनर म्हणून निश्चित झाले आहेत.
त्यामुळे मुलाच्या उपचारासाठी वडिलांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असल्याचे न्यायालयास सांगण्यात आले. याच वैद्यकीय पार्श्वभूमीवर आरोपीने २१ ऑगस्ट २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीसाठी तात्पुरता वैद्यकीय जामीन मागितला होता.
न्यायालयाने आरोपीची वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थिती विचारात घेत २१ ऑगस्ट २०२६ पासून ४ जानेवारी २०२७ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे.
मात्र, हा जामीन काही कठोर अटींसह देण्यात आला आहे.
आरोपीला संपूर्ण जामीन कालावधीत मुंबईच्या हद्दीतच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईच्या हद्दीबाहेर जाण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. तसेच खेरवाडी पोलीस ठाणे, वांद्रे पूर्व, मुंबई येथे दर आठवड्याच्या पहिल्या सोमवारी हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
जामिनासाठी आरोपीला ५० हजार रुपयांचा PR Bond तसेच त्याच रकमेचे एक किंवा दोन स्थानिक जामीनदार देण्याची अट ठेवण्यात आली आहे.
याशिवाय आरोपीने जामिनाचा वापर केवळ मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी करावा, पुराव्यात कोणतीही छेडछाड करू नये, तक्रारदार किंवा साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये आणि न्यायालयाने घातलेल्या कोणत्याही अटीचा भंग करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
त्यामुळे वैभव वाघे खून खटल्यातील आरोपीला कायमस्वरूपी जामीन मिळालेला नसून, मुलाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि उपचारांसाठी विशिष्ट कालावधीपुरता हा तात्पुरता वैद्यकीय जामीन असल्याचे महत्त्वाचे आहे.
ॲड. सोमनिंग पुजारी :















