सोलापूर तालुक्यातील भीमा नदी काठावरील कारकल या गावाला चार ऐवजी आता आठ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले आहेत. तसे पत्र वीज वितरण विभागाला देण्यात आले आहे.
आमदार प्रणिती शिंदे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. चिंचपूर येथील बंधाऱ्यात साडेचार मीटरपर्यंत पाणी साठविले जाते, या पाण्याचा शेतीसाठी अधिक उपसा होऊ नये याकरिता महानगरपालिकेच्या सूचनेनुसार कुरघोट, औज (मं), कारकल ही गावे वॅकवॉटरमध्ये येत असल्यामुळे या गावांना चार तास वीजपुरवठा करण्यात येत होता, त्यामुळे या तिन्ही गावातील शेतीचा विजेचा प्रश्न गंभीर बनला होता. पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने पिके पाण्याविना करपून जात होती. या भागातील शेतकऱ्यांची आठ तास विजेची मागणी होती. मात्र, कोणत्याच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची होती. गत महिन्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे या कारकल येथे एका कार्यक्रमासाठी आले होते, यावेळी सरपंच अमोगसिध्द देशमुख, उपसरपंच सिध्दप्पा हंजगी, सोमू देशमुख व शेतकऱ्यांनी हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांना कारकल गावास आठ तास वीज पुरवठा करण्याची मागणी केली. याची तत्काळ दखल घेत सुशीलकुमार शिंदे व आमदार शिंदे आणि हसापुरे यांनी प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली केल्या. आयुक्त व वीज वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांवरोवर वैठक घेतली. कारकल हे गाव सात किलोमीटर अंतरावर आहे, हे गाव चिंचपूर बंधाऱ्यापासून वॅकवॉटरमध्ये येत नाही, त्यामुळे या गावाला तत्काळ आठ तास दिवसा वीजपुरवठा करावा अशा सूचना केल्या. त्यानुसार महापालिकेचे आयुक्त शिवशंकर यांनी बुधवारी यावावतचे आदेश दिले. त्यामुळे यापुढे कारकल गावाला आठ तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळाला
कारकल या गावास आठ तास वीजपुरवठा करावा यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह आपण म.न.पा. आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. प्रशासकीय पातळीवर हालचाली केल्या. अखेर शिंदे परिवारामुळे शेतकऱ्यांना आठ तास वीज मिळणार आहे, आता पिकांना वेळेवर पाणी देता येणार आहे.
सुरेश हसापुरे, माजी संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक.



















