बापरे ! सोलापूर जिल्ह्यात पुन्हा या रोगाचा शिरकाव ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश
सोलापूर : सोलापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी शुक्रवारी एक नवा आदेश जारी केला आहे. जनावरांमध्ये लंपी या चर्मरोगाचा पुन्हा शिरकाव झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे यांचेकडे जिल्हयातील गोवर्गीय जनावरांमधील पाठविण्यात आलेले रोग नमुने हे लम्पी चर्म रोगासाठी होकारार्थी आले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी काढलेल्या आदेशात त्याअर्थी मी, कुलदिप जगंम, जिल्हाधिकारी, सोलापूर तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, सोलापूर या आदेशान्वये संपुर्ण सोलापूर जिल्हा गोवर्गीय जनावरांमधील लम्पी चर्मरोग या रोगासाठी “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषित करुन खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
१. लम्पी चर्म रोगावर नियंत्रण, प्रतिबंध व निर्मुलन करता येईल आणि (गुरे) आणि गोजातीय प्रजातीमधील इतर सर्व प्राणी (म्हेस वर्गीय वगळून) यांना ज्या ठिकाणी ते पाळले जातात त्या ठिकाणापासून उक्त नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण व वाहतुक करतांना किमान २८ दिवसांपूर्वी लम्पी चर्मरोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
२. कोणत्याही व्यक्तिस, उक्त बाधीत गोजातीय प्रजातीचे जीवंत अथवा मृत प्राणी, कोणत्याही उक्त बाधीत झालेल्या गोजातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्यापासूनचे अन्य कोणतेही उत्पादन उक्त नियंत्रित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करीत आहे.
३. कोणत्याही गांजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरवणे व बाजारातील खरेदी विक्री करतांना किमान २८ दिवसांपूर्वी लम्पी चर्मरोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र व पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांचा आरोग्य दाखला सादर करणे बंधनकारक राहील.
४. गोवर्गीय प्राण्यांच्या शर्यती आयोजित करणे, जत्रा भरवणे, प्रदर्शन आयोजित करणे इ. प्रसंगी सहभागी होणारी सर्व गोवर्गीय प्रजातीच्या जनावरांचे किमान किमान २८ दिवसांपुर्वी लम्पी चर्मरोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र व पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांचा आरोग्य दाखला सादर करणे बंधनकारक राहील.
५. प्रयोगशाळा निदानामध्ये जिल्हयातील ज्या भागातील पशुपालकांचे गोजातीय प्रवर्गातील जनावरांना लम्पी चर्म रोगाची लागण झाल्याचे निष्कर्ष होकारार्थी येतील अशा ठिकाणापासून ५ कि.मी. त्रिजेच्या परिघामधील सर्व संक्रमित न झालेले जनावरांचे रिंग व्हॅक्सीनेशन त्वरीत करुन रोगाचा फैलाव इतरत्र होणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे.
६. लम्पी चर्म रोगाचा फैलाव इतरत्र होवू नये यासाठी केंद्र शासनाच्या अॅडव्हायजरी नुसार याहय किटक नियंत्रण कार्यक्रम (Vector control Programme) जिल्हयामधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये (नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात) राबविणेत यावा.
७. लम्पी चर्म रोगाविषयी पशुपालकांमध्ये जनजागृती व माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत व्यापक प्रसिध्दी देण्यात येऊन रोगाचे नियंत्रण व निर्मुलन होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने कामकाज करावे.
सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यास यावी.