सोलापूर- प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या *१४, १५ आणि १६ ऑक्टोबर २०२२ रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे ”प्रिसिजन गप्पा’ आयोजिण्यात आल्या आहेत.* सोलापूरकरांना दिवाळी आधी गप्पांची दिवाळी अनुभवता येणार आहे. सलग दोन वर्षांच्या ऑनलाईन गप्पांच्या वेगळ्या अनुभवानंतर यावर्षी प्रत्यक्ष गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा व प्रिसिजन उद्योगसमूहाचे चेअरमन यतिन शहा हे उपस्थित होते.
यंदाच्या प्रिसिजन गप्पांना शुक्रवार दि. १४ रोजी ऑक्टोबर २०२२ ’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सुरवात होईल. प्रसिद्ध सिने अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदन सोहळा पार पडेल. या वर्षाचा ’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हा लातूर येथील जन-आधार सेवाभावी संस्थेच्या संजय कांबळे यांना देण्यात येणार आहे,’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सन्मानचिन्ह आणि रूपये तीन लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार हा वात्सल्य सामाजिक संस्था, मंगरुळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव. संस्थेच्या उमाकांत मिटकर यांना देण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह आणि रूपये दोन लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार सोहळ्यानंतर प्रसिद्ध सिने अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांची चित्रपट ते सामजिक प्रवास घडवणारी
” नाम ” मात्र मकरंद, या दिलख़ुलास मुलाखतीचा कार्यक्रम होईल.संभाजीनगरचे प्रेषित रुद्रावार हे ही मुलाखत घेतील.
शनिवार दि.१५ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशी अल्पावधीतच संगीत रसिकांच्या पसंतीस उतरलेला कोकणातल्या कन्यांचा महाराष्ट्रच नव्हे तर देश गाजवत असलेला भन्नाट बँड
” कोंकण कन्या बँड” हा कार्यक्रम सादर होईल. या बँडमध्ये आरती सत्यपाल, अरुंधती तेंडूलकर, रसिका बोरकर, स्नेहा आयरे, निकिता घाटे, साक्षी मराठे हे कलाकार तर रविराज कोलथरकर हे संगीतकार आपली कला सादर करतील.
रविवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी “महाराष्ट्राची हास्य जत्रा – बिहाइंड द सीन” या आगळ्या वेगळ्या मुलाखतीतून प्रसिद्ध हास्य अभिनेते समीर चौघुले, वनिता खरात, ओंकार राउत, पृथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या हास्याचे फवारे अनुभवायला मिळणार आहेत. गौरव मोरे हे लंडन हून ऑनलाइन कार्यक्रमात उपस्थित राहतील. शुभांगी भुजबळ ह्या या कलाकरांची मुलाखत घेतील.
प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे तीनही दिवस सायंकाळी ६.२५ वा. गप्पांना प्रारंभ होईल. नेहमीप्रमाणेच शिवछत्रपती रंगभवनच्या प्रांगणातही आसनव्यवस्था व एलईडी प्रोजेक्टरद्वारे कार्यक्रम पाहण्याची सोय असेल. रसिक सोलापूरकरांनी ’प्रिसिजन गप्पां’चा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन डॉ. सुहासिनी व यतिन शहा यांनी केले.



















