सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० या दलात पोलिसांची जवळपास २५८ पदे भरण्यात येणार आहेत. या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमुळे तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
रविवारी सर्व माध्यमांमध्ये सोलापूर शहर , सोलापूर ग्रामीण व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० यांच्या कार्यालयाकडून रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रक्रिये दरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल.
याशिवाय कार्यालयाने निश्चित केलेल्या शारीरिक व लेखी परीक्षेच्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करू शकतात. परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासगीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत असेही नमूद केले आहे.
पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई व पोलीस चालक पदासाठी प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.त्यासंदर्भातील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमदेवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमदेवारांची १०० गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेत ४० टक्के पेक्षा कमी गुण मिळणारे उमेदवार अपात्र समजण्यात येणार आहेत.
कागदपत्रे पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. शारीरिक चाचणी व लेखी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर गृहविभागाच्यावतीने अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले आहे.
पोलीस शिपाई, चालक पोलीस व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० च्या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या रिक्त जागेसंदर्भातील सविस्तर माहिती , अटी , नियम व अन्य माहितीसाठी policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी व अर्ज सादर करण्याबाबतची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूरशहर चालक ७३ ,पोलीस शिपाई ९८, सोलापूरग्रामीण चालक २८, पोलीस शिपाई २६, राज्य राखीव पोलीस बल ३३.



















