सोलापूर विजयपुर रोडवरील सोनी नगर परिसरात दोन निलगीर झाडांच्या मध्ये पतंगचा मांज्या लटकत होता. शराटी पक्षी त्याच मार्गावरून उडत असताना त्यात त्याचे पंख फसले व उलटा लटकु लागला.
सोनी परिसरातील रहिवासी सोलापुरे ह्यांनी घटनेची माहिती वाईल्ड लाईफ केअर संस्था सदस्यांना कळवली. प्रविण जेऊरे, पांडुरंग राऊत, तेजस म्हेत्रे, अभास कमलापुरे, गणेश तुपदोळे, अक्षय फुले व मुकुंद शेटे घटनास्थळी पोहचले.
तेव्हा काळ्या डोक्याचा शराटी (ब्लॅक हेडेड आयबीस) दोन झाडांच्या मधील पतंग मांज्यात फसलेला आढळला. उलटा लटकलेल्या पक्षीची सुटण्यासाठी प्रचंड धडपड सुरू होती. परंतु मांज्या आणखी घट्ट आवळत चालला होता. साधारण तीस फुट उंचीवर फसलेल्या शराटीला काढण्याचे प्रयत्न सुरू केले.
लोंबकळत असलेला मांज्या बांबूस हुक लावून खाली खेचण्यात आला. तसा पक्षी खाली खाली येत होता.पक्षी खाली येताच त्याचे कापडाने डोळे झाकण्यात आले. जेणे करुन तो जास्त घाबरुन जाऊ नये.
पंखात फसलेला सर्व मांज्या काढण्यात आला. पक्षीची सर्व तपासणी केली असता कोणतीही जखम आढळून आली नाही.
प्रचंड घाबरलेल्या शराटी पक्षास तात्काळ सोडले असता तो कशाला तरी धडकण्याची शक्यता होती. हा धोका ओळखुन शराटी पक्षीस एका बॉक्स मध्ये बंद ठेवण्यात आले. अर्धातासाने त्याच परिसरात बॉक्स उघडला असता शराटी पक्षाने जोरदार आकाशात झेप घेतली.
उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून पक्षीस पुढील निसर्ग मुक्त जीवनास शुभेच्छा दिल्या.
पहाता पहाता पक्षी उडत उडत डोळ्या आड निघून गेला. काळ्या डोक्याचा शराटी- भारतात सर्वत्र आढणारा पाणथळ परिसरात दिसणारा पक्षी. डोके ,चोच, व मान व पाय काळे रंगाचे असते तर सर्व शरीर पांढरे असते. पाणथळ परिसरात तलाव, नदी, भातशेती, धरण परिसरात हामकास दिसून येतात. गोगलगाई, मासोळी, बेडुक पानकिटक, गांडुळं हे त्याचे खाद्य आहे. कुदळ सारखी चोच सतत पाणथळ चिखलात मारताना दिसतो. म्हणून ग्रामीण भागात ह्याला कुदळ्या पक्षी म्हणतात.



















