सोलापूर : महाराष्ट्रात विक्री परवाना नसलेल्या मॉडर्न ऍग्री जेनेटिक लिमिटेड कंपनीचे कीटकनाशके विक्री करणाऱ्या व तपासणीत अनेक त्रुटी आढळलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 4 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्याची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केली. मॉडर्न ऍग्री जेनेटिक लिमिटेड कंपनीसह एका कृषी केंद्र चालकावर गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल कृषि केंद्र मु.पो. आष्ठी ता. मोहोळ, महावीर ट्रेडिंग कंपनी माळशिरस ता. माळशिरस, कलाशंकर कृषि केंद्र नातेपुते ता. माळशिरस व ओंकार कृषी केंद्र करकम्ब ता.पंढरपूर असे परवाने निलंबित करण्यात आलेल्या कृषी केंद्राची नावे आहेत. यासर्व कृषी केंद्रात महाराष्ट्रात विक्री परवाना नसलेल्या मॉडर्न ऍग्री जेनेटिक लिमिटेड कंपनीचे कीटकनाशके मिळून आले आहे.
पंढरपूर तालुक्यातील करकंब व बार्डी या गावातील 8 द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी ऑक्टोबर बाग छाटणी अगोदर 10 ते 15 दिवस ओंकार कृषी केंद्र करकम्ब येथून GLPHOSATE 41 टक्के SL हे तणनाशक फवारणी केली होती. छाटणीनंतर बाग फुटलीच नाही. त्यामुळे मोठे नुकसान झाले. याबाबत जेव्हा पंढरपूर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ही तक्रार आली असता त्यांनी पाहणी केली तेव्हा ओंकार कृषी केंद्र करकम्ब येथून GLPHOSATE 41 टक्के SL हे तणनाशक घेऊन फवारणी केल्याचे निदर्शनास आले.
चौकशी केली असता मॉडर्न ऍग्री जेनेटिक लिमिटेड कंपनीने महाराष्ट्रात कीटकनाशके विक्रीचा परवाना घेतला नाही तसेच त्यांनी परवाना मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक धनंजय दिनकर पाटील यांनी फसवणूक तसेच कीटकनाशके अधिनियम नुसार मॉडर्न ऍग्री जेनेटिक लिमिटेड कंपनीसह ओंकार कृषी केंद्र चालकावर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















