सोलापूर : विविध विकास कामांच्या माध्यमातून मोदी मुस्लिम कब्रस्तानचा कायापालट केल्यानंतर ख्रिश्चन स्मशानभूमी इथं नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या माध्यमातून तब्बल 79 लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा ख्रिश्चन धर्मगुरू तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
ख्रिश्चन स्मशानभूमी इथं अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होतं. पाण्याची देखील सोय नव्हती, तर अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली होती. शिवाय अंधाराचं साम्राज्य या परिसरात होतं. ही बाब लक्षात घेऊन माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी महापालिकेच्या माध्यमातून ख्रिश्चन स्मशानभूमी सुधारण्याचं काम हाती घेतलं. आता इथे तब्बल 79 लाख रुपये खर्च करून विविध सोयी सुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत. पी एल गायकवाड मेमोरियल शेल्टर, स्मशानभूमी अंतर्गत काँक्रीट रस्ते, स्मशानभूमी राखणदारास स्वतंत्र निवास, अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था, एलईडी दिवाबत्ती, पाण्याची टाकी यासह वृक्षारोपण आणि ट्री गार्ड लावण्यात येऊन ख्रिश्चन स्मशानभूमीचं रुपडं पुरतं पालटून गेलं आहे. या सर्व विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी रेवरंड विकास रणशिंगे, रेवरंड देवदास बेळी, रेवरंड इम्मानुएल म्हेत्रे, रेवरंड सचिन पारवे, सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
आपल्या प्रास्ताविकात जॉन फुलारे यांनी मुस्लिम कब्रस्तान तसंच ख्रिश्चन्स स्मशानभूमीची परिस्थिती आपण सुरुवातीपासून पाहत असून यामध्ये सुधारणा घडवण्याचा निर्धार आपण केला होता, आता इथे आलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
आपले विचार व्यक्त करताना रेवरंड विकास रणशिंगे यांनी श्रीदेवी फुलारे आणि जॉन फुलारे यांच्या सामाजिक बांधिलकीची तसंच कार्याची प्रशंसा केली. ख्रिश्चन्स स्मशानभूमीत सुधारणा घडवताना त्यांनी ईश्वरापर्यंत पोचणार कार्य केलं आहे. सर्वच समाज घटकाबद्दल त्यांना वाटणारा जिव्हाळा आणि असलेली आपुलकी यातून सामाजिक आणि राजकीय जीवनात ते कायम यशस्वी ठरतील असं प्रतिपादन या प्रसंगी रेवरंड विकास रणशिंगे यांनी केलं.
आभार मानताना श्रीदेवी फुलारे म्हणाल्या, मुस्लिम कब्रस्थान इथे आपल्या माध्यमातून विकास कामं झाली, त्यानंतर ख्रिश्चन स्मशानभूमी सुधारणेच आपण नियोजन केल होतं. त्यानुसार इथे सर्व त्या सुविधा निर्माण करून देता आल्या याचं आपणास समाधान वाटतं असे सांगत पालिका प्रशासनाचे देखील त्यांनी आभार मानले.
दरम्यान ख्रिश्चन स्मशानभूमीत 79 लाख रुपयांची विकास कामं झाल्याबदल श्रीदेवी फुलारे आणि जॉन फुलारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पास्टर योहान कानेपागोलू, संजीव मोरे, जॉन दिनकर, शांतराज जंगम, बेंजामीन बलगेरी, विनय कुमार जॉन वेल्सन, डॅनियल जाधव, विशाल लोंढे, अशोक पवार, सिमेट्री चेअरमन अविनाश अखाड़े यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती.





















