सोलापूर शहरात रविवारी रात्री ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली भर रस्त्यात पलटी झाली. ऊसाच्या मोळीखाली दुचाकीस्वार आला मात्र सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो वाचला.
सोलापूर शहरात पत्रकार भवन चौकातून पुढे महावीर चौक मार्गे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे जाणारा उसाने भरगच्च भरलेला एक ट्रॅक्टर आपल्या ट्रॉली सहित महावीर चौक होटगी रोड येथे पलटी झाला. ही ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होताना तेथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या अंगावर देखील उसाचा ढिगारा पडला. काही कळण्याच्या आत त्याच्या अंगावर उसाचा ढिगारा कोसळल्याने तो खाली दाबला गेला. घाबरलेल्या अवस्थेत बाहेर पडण्याचे प्रयत्न करत होता त्याचवेळी तिथे बघायची गर्दी झाली आणि नागरिकांनी उसाच्या मोळ्या बाजूला सरकवत त्या दुचाकीस्वाराला अलगदरीत्या सुखरूप बाहेर काढले आहे.
त्यामुळे दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले आहेत. साखर कारखान्याला जाणाऱ्या उसाचा ट्रॅक्टर ट्रॉली धोकादायकरित्या ड्रायव्हर गाणी ऐकत बिनधास्तपणे वाहने चालवत असतात अशा ट्रॅक्टर ट्रॉलीजना मागून कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर लावलेले नसतात त्यामुळे हे ट्रॅक्टर ट्रॉली धोकादायक ठरत आहेत. अशा बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टर ट्रॉलींवरती पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी काही नागरिकांनी केली जात आहे.


















