सोलापूर : एमआयएम पक्षात अभ्यासू समजले जाणारे ज्येष्ठ नेते समीउल्ला शेख यांनी मंगळवारी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. एमआयएमची पतंग सोडून त्यांनी शिवसेनेची धगधगती मशाल हातात घेतली आहे.
समीउल्ला शेख हे मुस्लिम समाजातील अभ्यासू नेते समजले जातात. 2014 साली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी शहर मध्य या मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाकडून उमेदवारी घेतली होती. मात्र 2014 साली एमआयएम पक्षाचा सोलापूर मध्ये प्रवेश झाला त्यावेळी सोलापुरात मुस्लिम समाजात तयार झालेले एमआयएमचे वातावरण पाहता होम मैदानावर एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विराट सभेमध्ये बहुजन मुक्ती पार्टी सोडून भर निवडणुकीत त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून ते एमआयएम मध्ये कार्यरत आहेत.
दरम्यानच्या काळात तत्कालीन एमआयएम नेते तोफिक शेख हे खुनाच्या गुन्ह्यात अटक झाले होते, त्यावेळी समीउल्ला शेख हे चर्चेत आले. तेव्हा मुस्लिम समाजातून त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर वर्षाने एमआयएम पक्षाची धुरा फारूक शाब्दी यांच्या खांद्यावर आली. तेव्हापासून पुन्हा समीउल्ला शेख हे पक्षात सक्रिय झाले होते.
काही महिन्यांपासून शेख हे एमआयएम मध्ये कुठेही दिसून आले नाहीत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची मोठी सभा झाली यावेळी समीउला शेख यांनी एमआयएम पतंग सोडून शिवसेनेची मशाल हातात घेतली. शेख यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे एमआयएम पक्षाला मोठा धक्का समजला जात आहे.

















