सोलापूर : होम मैदानावर गुरुवारपासून पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली. पहिल्यांदाच मोठ्या स्वरूपात कृषी प्रदर्शन सोलापुरात भरले आहे. या कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे दीड टन वजन असलेला गजेंद्र नावाचा रेडा आणि राजा हा खिलार बैल. कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी या दोघांसोबत सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
गजेंद्र नावाचा रेडा हा मुऱ्हा जातीचा असून त्याची आई हरियाणाची आहे त्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. विलास गणपती नाईक यांचा रेडा असून 12 जणांचे कुटुंब त्याची देखभाल करतात. दररोज त्याला 15 लिटर दुध व 2 किलो सफरचंद असा खुराक आहे. सोलापुरातील 5 दिवस खाद्याचा खर्च कृषी प्रदर्शन संयोजन समिती करणार असल्याची माहिती मिळाली.
दुसरे आकर्षण आहे ते राजा या खिलार बैलाचे.
मोहोळ तालुक्यातील शेजबाभूळ गावातील शशिकांत पूदे यांचा हा बैल असून त्याचे नाव राजा आहे. कोसा खिलार या जातीचा हा बैल असून कलर बाजरी, रुंद छाती, उंची साडे पाच फूट आहे. राजाला 25 लाख रुपयाला मागितल्याचे सांगण्यात आले. बैलगाडी शर्यत व गाई पैदाससाठी चालतो.


















