सोलापूर : सोलापुरात राजकीय वातावरण सध्या तरी शांत आहे. महापालिका निवडणूक होण्याची शक्यता अद्याप तर नाही. याच पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी आणि आंबेडकरी नेते माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची एका कार्यक्रमात भेट झाली. केवळ भेट नाही तर बराच वेळ या दोन नेत्यांमध्ये ‘गुफ्तगू’ सुरू होती. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सोलापुरात नवी राजकीय समीकरण समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसे पाहिले तर या दोन्ही नेत्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली आहे. आनंद चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षा कडून शहर उत्तर मतदारसंघात निवडणूक लढवताना दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवताना शहर मध्य मतदारसंघात फारूक शाब्दी यांनी ही दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी लक्ष वेधून घेतले होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षाची युती होती. त्यावेळी मुस्लिम व आंबेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. ती युती फार काळ टिकली नसली तरी नव्या राजकिय समीकरणांची नांदी ठरली.
चंदनशिवे जरी सध्या कोणत्या पक्षात नसले तरी ऐनवेळी ते धक्का देऊ शकतात. चंदनशिवे यांना मानणारा सोलापुरातील आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. फारूक शाब्दी यांच्या एमआयएमची क्रेझ मुस्लिम समाजात कायम आहे. हे दोन्ही समाज जर स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये एकत्र आले तर निश्चितच महापालिकेची राजकीय गणिते बदलतील अशी चर्चा केली जाते. त्यासाठी तर या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.


















