सोलापूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागात बोगस शिक्षणाधिकारीच्या नावाखाली एका महिलेने गोंधळ घातला. तिने थेट निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनीच आपली वसुलीसाठी नेमणूक केल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली होती. यात प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना मात्र काही दिवस फुकटची डोकेदुखी झाल्याचे दिसून आले.
हा विषय कुठे तरी शांत होतोय तोपर्यंत टेंभुर्णीत बोगस शिक्षणाधिकारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या संस्थेत ते तपासणीसाठी गेले होते त्या संस्था चालकाला संशय आल्याने ते तिथून पळून गेले. याबाबत टेंभुर्णी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळाली.
टेंभुर्णी येथे हरिश्चंद्र गाडेकर यांची स्वामी समर्थ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था आहे. या संस्थेमध्ये गुरुवार 5 जानेवारी रोजी दुपारी तीनच्या दरम्यान एक महिला व एक पुरुष शाळेत अधिकारी म्हणून आले. त्यांच्या गळ्यात बोगस आयडेंटी कार्ड होते. विद्यार्थ्यांनी गाडेकर यांना शाळेत अधिकारी आलेत म्हणून सांगितले तेव्हा ते गेटवर गेले असता त्यांनी त्यांच्या आयडेंटी कार्ड पाहिले आणि त्याचा फोटो काढत असताना त्यांना संशय आला. तेव्हा हिसकावून ते पळू लागले. त्यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते गाडीत बसून पसार झाले. त्या गाडीच्या पाठीमागे ‘कोळेकर महाराज’ असे लिहिले होते गाडीचा नंबर पाहिला असता एमएच 13 झेड 45.. गाडी पुढे गेल्याने पुढील दोन नंबर त्यांना दिसले नाहीत.
या घटनेनंतर गाडेकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावून विचारले असता ‘निपुण भारत शाळा’ तपासणी आहे, बाकी इतर कोणतीही तपासणी नाही असे त्यांच्याकडून कळाले. त्यामुळे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हरिश्चंद्र गाडेकर यांनी चौकशी व्हावी अशी तक्रार दाखल केल्याने पुन्हा या विषयाला तोंड फुटले आहे.





















