दक्षिण सोलापूर : निंबर्गी व पंचक्रोशीतील नूतन सरपंच व उपसरपंच तसेच नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन निंबर्गी ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी झाले. काँग्रेस नेते सुरेश हसापुरे व गंगाधर बिराजदार यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.
हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता होता, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने हे नेते साडे पाच वाजता निंबर्गी गावात दाखल झाले. सर्व नेते आमदार प्रणिती शिंदेंची वाट पाहत बसले. सोलापूर शहरात अनेक कार्यक्रम असल्याने आमदार ताईंना निंबर्गी गावात यायला उशीर झाला. तब्बल दोन तास माने व म्हेत्रे हे दोन्ही नेते वाट पाहत बसले.
शेवटी वाट पाहून आणि झालेली नागरिकांची गर्दी पाहून नेत्यांनी सात वाजता कार्यक्रम सुरू केला. अर्ध्या तासाने आमदार प्रणिती शिंदे यांचे आगमन झाले तेव्हा साडे सात वाजले होते. दिलीप माने समर्थक, काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि हसापुरे समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.
कार्यक्रम ज्याठिकाणी होता त्या व्यासपीठाची जागा अतिशय छोटी होती. केवळ दोन रांगेतच मान्यवरांना बसण्याची जागा होती. व्यासपीठावर बसायला होत असलेली गर्दी पाहून सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने , बाबा मिस्त्री, चेतन नरोटे ही नेतेमंडळी या स्टेजवर पुढे पाय सोडून बसले त्यामुळे मागे इतरांना बसायला जागा झाली. यावरून सुरेश हसापुरे यांच्यासाठी काय पण ! असे चित्र नेत्यांमध्ये दिसले.


















