सोलापूर : अनेक दिवसानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यात आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने व काँग्रेस नेते सुरेश हसापुरे हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर दिसून आले. यावेळी या नेत्यांची भाषणे ही तितकीच रंगली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दक्षिण सोलापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे.
याच पार्श्वभूमीवर निंबर्गी व पंचक्रोशीतील नूतन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन निंबर्गी गावात करण्यात आले होते. हाच धागा पकडून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण तालुक्यात मिळालेल्या या यशाबद्दल सर्व तालुक्यातील जनतेचे आभार व्यक्त करत सुरेश हसापुरे यांचा पायगुण चांगला आहे, काँग्रेस पक्षाला तालुक्यात आता यश मिळू लागले आहे, कामे होऊ लागलीत, दक्षिण तालुक्याशी संपर्क तुटला होता आता तो तुमच्यामुळेच सुरू झालेला आहे.
दक्षिण तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला त्यामुळे माने साहेब मला माफ करा, मी मुद्दाम काँग्रेसचा उल्लेख करते, कारण दक्षिण तालुक्याने सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री केले, आपण स्वतः काँग्रेस कडूनच आमदार होता, तुम्ही म्हणालात काही नेते इकडे तिकडे जातात पण हाल मात्र कार्यकर्त्यांचे होतात आणि माने साहेब आपले आभारही मानते कारण तुम्ही सहकार्य केल्यामुळे भाजपच्या विरोधात एकत्र लढलो त्यामुळे तालुक्यात एवढे मोठे यश मिळाले. म्हणून सर्वजण म्हणतात, एक व्हा, आता ती वेळ आलेली आहे, आणि या एकीसाठी मी प्रयत्नशील राहणार असे ही त्या म्हणाल्या… पहा आमदार ताईंचे भाषण

















