सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी गावात सुरेश हसापुरे यांनी घेतलेल्या कार्यक्रमाला दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी आवर्जून उपस्थिती लावली. या कार्यक्रमात आप्पासाहेब काळे यांनी जर दिलीप माने यांनी विधानसभा लढवली तर त्यांनी निश्चितच दक्षिणमधून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर भाषणाला उठलेल्या दिलीप माने यांनी दक्षिण तालुक्यात मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना या भागातील कार्यकर्ते चांगले आहेत मात्र नेते काड्या करतात परंतु आम्हाला आता चिमटे बसलेत त्यामुळे तर एकत्र आलोय असे सांगताना सुरेश हसापुरे यांना ‘चिमटे’ काढले.
निम्बर्गी ग्रामपंचायत निवडणूक लागली तेव्हा आमचे पॅनल तयार होते परंतु, सरपंच पदासाठी श्रीदीप हसापुरे हे उमेदवार समजल्यानंतर आपण पाठिंबा देण्याचे ठरवले, हसापुरे यांचा मुलगा काय अन् माझा मुलगा काय, उगवत्या नेतृत्वाला अडचण येऊ नये म्हणून हसापुरे यांचे चिरंजीव निवडणूक लढवत आहेत त्यामुळे त्यांना आपण पाठिंबा द्यायचा आणि कोणतेही दगा फटका न करता ही निवडणूक जिंकायची असे ठरवले म्हणूनच आज हे यश मिळाले आहे. हसापुरे यांना मी चांगला ओळखतो त्यांच्या मुलाने राजकारणात पुढे जाऊन वडिलांपेक्षा नाव करावे असे म्हणताच खालून सिद्धाराम म्हेत्रे यांनी आता हसापूरे यांची रिटायरमेंट का? असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला..


















