सोलापूर : गोरगरीब, कष्टकरी, कामगारांसाठी होत असलेल्या स्वप्नातील तीस हजार घरांच्या प्रकल्पासाठी आपले तात्विक शाब्दिक मतभेद बाजूला सारून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझे 100 टक्के सहकार्य राहील असा शब्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आडम मास्तर यांना दिला. मास्तर यांनी केलेल्या सर्व मागण्या प्रशासकीय व राज्य पातळीवर सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मी राज्याचा गृहमंत्री असताना या प्रकल्पाला भेट दिली होती त्यावेळी दहा कोटी रुपये तात्काळ मंजूर केले त्यावेळी दाखवून दिलेल्या त्रुटीही आता सुधारण्यात आल्या आहेत असे सांगताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाणीपुरवठा योजनेसाठी टेक्निकल बाबी तपासण्यासाठी तीन टक्के फी आहे ती माफ करावी यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही सुद्धा पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.
कुंभारी येथे रे – नगर फेडरेशनच्या 30 हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी महागृहनिर्माण प्रकल्पास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी यांची उपस्थिती होती. पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.




















