अजितदादांच्या ‘बर्थ डे’ नियोजनासह किसन भाऊंचा विधानसभा लढवण्याचा संकल्प
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी राखीव ठेवण्याची मागणी बरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली आहे. पक्षाने आदेश दिला तर मी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीन, अशी माहितीही यावेळी किसन जाधव यांनी यावेळी दिली.
यावेळी कबड्डी संघटनेचे पदाधिकारी मरगू जाधव, संतोष जाधव आदींची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त सामाजिक उपक्रमांचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.
यानिमित्ताने २० जुलै रोजी सोलापुरातील शंकर भवन सभागृहात भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन संघास अनुक्रमे ११ हजार, ७ हजार व १ हजार रुपयांचे पारितोषिक व टॉफी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत ३० संघ सहभागी होणार आहेत.
रामवाडी येथील महापालिका आरोग्य केंद्रात २२ जुलै रोजी जन्म झालेल्या प्रत्येक मुलाच्या नावे पाच हजार रुपयांची फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे. यावेळी या दिवशी जन्म घेतलेल्या बाळांचे स्वागत करण्यात येणार आहे. मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव न करता जन्म घेतलेल्या प्रत्येक मुलाच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी जाधव यांनी सांगितले.
रामवाडी परिसरातील क्षयरोग रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४१ रुग्णांसाठी २२ जुलै रोजी प्रत्येकी आठ हजार रुपयांचे फूड कीट वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय या दिवशी रक्तदान व आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची व्यापक जनजागृती करुन या योजनेच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याचा उपक्रमही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ जुलै पर्यंत सुरु असणार असल्याचे यावेळी जाधव यांनी
सांगितले.