सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. पक्ष पुनर्बांधणीसाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. सकाळी ते पंढरपूर वरून मंगळवेढा मार्गे सोलापुरात सर्वप्रथम श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्याठिकाणी दर्शन घेतले.
त्यानंतर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी त्यांचे आगमन झाले. कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यासाठी तब्बल वीस फुटाचा हार क्रेनद्वारे घालण्यात आला. यावेळी काही प्रमाणात गर्दी वाढल्यामुळे ढकलाढकलीचा प्रकार देखील घडला.
अमित ठाकरे हे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष देखील आहेत त्यामुळे राज ठाकरे यांना मानणारा व त्यांना प्रेरित होऊन अनेक विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सोलापुरात आल्याचे पाहायला मिळाले.


















