सोलापूर : सुशीलकुमार शिंदे अडचणीत येतील अशी वक्तव्य शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी टाळावी, बारामतीला चॅलेंज करणं त्यांना नव्हे तर सुशीलकुमार यांनाच अवघड जाऊ शकतं असे इशारा वजा सुचित वक्तव्य माजी महापौर महेश कोठे यांनी केले आहे.
कोठे म्हणाले, शहर काँग्रेस अध्यक्षांनी मर्यादित अधिकार असताना आपल्या मर्यादेतच बोलावं. ते शहर अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष नाहीत याचं भान ठेवावं. लोकसभेच्या निवडणुकांचे जागावाटप किंवा उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही. विनाकारण काहीतरी बोलायचं आणि आघाडीमध्ये वितृष्ठ वाढवायचं काम चेतन नरोटे यांनी केलं आहे. खरं तर हा विषय काँग्रेस पक्षांनाच सुरू केला .आरिफ शेख यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्ही लोकसभा लढवा असे सांगितलं.
अर्थात आरिफ शेख यांचे हे वक्तव्य सहजपणे आणि चेष्टेत होतं .त्याचं एवढं गांभीर्य घेण्यापेक्षा चेतन नरोटे यांनी आरिफ शेख यांचे हे वैयक्तिक वक्तव्य आहे असं सांगून विषयावर पडदा टाकायला हवा होता. चेतन नरोटे यांनी विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डीवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेसह अनेक निवडणुका एकत्रित लढवायच्या आहेत. अजूनही लोकसभेच्या सोलापूर जागेविषयीचा प्रदेश किंवा केंद्रीय पातळीवर कोणताच निर्णय झालेला नाही, मग ही घाई का? पत्रकारांनी रोहित पवार यांना सोलापूरची जागा राष्ट्रवादी लढवणार का? असे विचारल्यावर ते म्हणाले, दोन वेळा काँग्रेस येथून पराभूत झाले आहे म्हणून या जागेवर आम्ही मागणी करू शकतो. ते पवार कुटुंबाचे आहेत, आमदार आहेत या अधिकाराने ते बोलले असतील त्यांना प्रत्युत्तर देताना बारामतीच्या जागेवर चेतन नरोटे यांनी आपल्या मर्यादा सोडून मागणी केली आहे .
त्यांचीही बडबड आगामी निवडणूक काळात सुशीलकुमार शिंदे यांनाच अडचणीची ठरू शकते असेही महेश कोठे म्हणाले. सुशीलकुमार शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणी असा दावा केला असता तर विषय वेगळा होता. चेतन नरोटेंनी पक्षांतर्गत चर्चा विनाकारण सार्वजनिक केली आहे.
आपण सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचार करणार का या प्रश्नावर महेश कोठे म्हणाले, शिंदे साहेबांनी स्वतःच आपण निवडणूक लढणार नाही असं घोषित केलं आहे .त्यांच्या प्रचाराचा प्रश्न येईलच कसा? माझा पक्ष ज्याचा आदेश देईल त्याचा नक्कीच प्रचार करेल.


















