सोलापूर : सूरत-चेन्नई महामार्ग व तांदूळवाडी ते केगांव बाह्यवळण रस्त्याचा शेतकऱ्यांच्या बाधित होणाऱ्या जमिनीचा समृद्धी महामार्गाप्रमाणे योग्य तो मोबदला त्वरीत मिळावा याचबरोबर शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यासाठी बुधवारी, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळेगांव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्याबरोबर त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी, २२ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव, उळेगांव पंचक्रोशीतील शेतकरी उळेगांव येथील राष्ट्रीय महामार्गावर एकत्र आले होते.
शेतकऱ्यांची विज कनेक्शन तोडणी त्वरीत थांबवावी, थकीत एफ आर पी अधिक व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे, ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, रासायनिक खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने अनुदान देऊन त्या किंमती नियंत्रणात आणाव्यात, ज्या शेतकऱ्यांनी पिक विम्याच्या तक्रारी नोंदविल्या आहेत, त्यांच्या खात्यावर पिक विमा त्वरित जमा करावा आणि कापूस व सोयाबीनला १२ हजार रुपये हमी भाव मिळावा यासह प्रमुख १० मागण्यासाठी हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
शासनाने या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. खा. राजू शेट्टी यांनी केलेल्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी यावेळी केले. संभाव्य वीज वाढीस विरोध, शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल पूर्ण माफ करणे आणि बुलढाणा येथे शेतकऱ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज झाल्याच्या घटनेची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी युवा नेते मोहसिन पटेल आणि शेतकरी नेते दत्तात्रय पांढरे यांनी केली.
यावेळी अमोल वेदपाठक, महेश भोज, गोविंद वेदपाठक, मनोज वेदपाठक, बिरु रामा मोटे, कृष्णात नवनाथ हेडे, परमेश्वर नागनाथ गाढवे, दिनेश रमेश शिंदे, प्रशांत बब्रुवान शिंदे, प्रमोद नागनाथ घोडके, विनायक घोडके, आण्णासाहेब डांगे, लक्ष्मण भानुदास शिंदे, सतीश आप्पाराव खंडागळे, सुनिल ज्ञानेश्वर चव्हाण, महेश सुरेश स्वामी, वाहेद काझी, प्रशांत मस्के आणि सादिक पठाण यांच्यासह शेतकरी-कष्टकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















