सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गावठाण, गायरानमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना ग्रामपंचायतीने घरकुल मंजूर केल्यानंतर त्यांना ग्रामसेवक हप्ता देण्यासाठी उतारा द्या म्हणतात त्यांनी उतारा कुठून आणावा. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जबाबदारी समजून त्यांना उतारा देण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे भैय्या देशमुख यांच्यासह लाभार्थ्यांनी आंदोलन केले.
सायंकाळी पोलीस प्रशासनाने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांची भेट घालून दिली. सुरुवातीला देशमुख मोठ्या तावात दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगूनही तुम्ही कार्यवाही करीत नाही. असे अनेक प्रश्न केले. त्यावेळी कोहिनकर यांनी त्यांना शांत करत जिल्हा विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. काही गावांमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. मोहोळ गटविकास अधिकाऱ्याकडून सविस्तर माहिती घेतली. गरजू लाभार्थ्यांना शासन स्तरावर जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.
लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असे सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा देशमुख यांनी लेखी मागितले, तर डीआरडीए विभागाला लेखी देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे तावातावाने आलेले भैय्या देशमुख आनंदी चेहऱ्याने बाहेर पडले.


















