ब्रेकिंग : देवेंद्र कोठे भाजपमध्ये दाखल ; घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट ; मोठी राजकीय घडामोड
सोलापूर : माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देवेंद्र कोठे यांचे पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे.
बुधवारी सकाळी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भेट घेतली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, देवेंद्र कोठे हे सोलापूरच्या राजकारणातील आश्वासक नेते आहेत. विकासाची जाण असलेले, जनमानसात लोकप्रिय असलेले आणि उत्तम संघटक असलेले देवेंद्र कोठे यांनी भाजपासोबत येण्याचा निर्णय केल्यामुळे भाजपचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. आगामी काळात सोलापुरातील अनेक नेते भाजप आणि महायुती सोबत येणार आहेत. माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांना सर्वस्तरातून मिळत असलेल्या कामाची पावतीच आहे.
माजी नगरसेवक देवेंद्र कोठे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या पुढील सकारात्मक राजकीय प्रवासाची जबाबदारी आणि पालकत्व घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख राजकारणाने प्रेरित होऊन आम्ही भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र कोठे हे दोन वेळा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याने कायमची चर्चा होत राहते ते थेट नागरिकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे महेश कोठे यांना हा धक्का मानला जात आहे.
देवेंद्र कोठे हे भाजपमध्ये गेल्याने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना बळ मिळाल्याचे बोलले जाते.