सोलापूर : पुणे कसबा मतदारसंघात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले. कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता त्या मतदारसंघात काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे तर पिंपरी चिंचवड मतदार संघात मत विभाजन झाल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाला.
या विजयाचा जल्लोष काँग्रेस आणि शिवसेनेने भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या शहर उत्तर मधील टिळक चौकात साजरा केला. फटाक्याची आतिषबाजी करून लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी चिंचवडचा उमेदवार पराभूत झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या जल्लोषामध्ये सहभाग नोंदवला नाही.
काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी विजयी प्रतिक्रिया देताना भाजपच्या विरोधी लाटेची ही सुरुवात आहे. आता मुंबई महापालिका असेल अथवा राज्यातील कोणत्याही निवडणुका लावा, महाविकास आघाडीचाच विजय होईल असा दावा केला.


















