सोलापुरातील या दोन नेत्यांमधील राजकीय वैर आता संपलेलं असल्याचे चित्र नुकतच पाहायला मिळालं. त्याला कारण ही तसंच होतं. मनोहर सपाटे यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आणि हा वाढदिवस जंगी स्वरूपात साजरा झाला. प्रसारमाध्यमांमध्येही या वाढदिवसाची चर्चा पाहायला मिळाली. सपाटे यांच्या नागरी सत्काराला खुद्द महेश कोठे यांनी हजेरी लावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
2009 साली महेश कोठे यांच्या विरोधात सपाटे यांनी बंडखोरी केली. त्यावेळी कोठे यांचा थोडक्यात मतांनी पराभव झाला तेव्हापासून हे वैर आणखी वाढलं होतं परंतु, सोलापुरातील राजकीय समीकरण बदलली आणि 30 वर्षाचं राजकीय वैर कुठंतरी संपल्याचे चित्र दिसून आले.
महेश कोठे यांनी आपल्या भाषणात सांगताना मुद्दामून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला. राजकारणात जे घडायचं नसतं ते शरद पवार घडवून आणतात, त्यामुळेच आम्ही दोघं आज एकत्र आलो आहोत, सपाटे साहेबांना कुठे थांबायचं हे जर कळालं असतं तर ते महाराष्ट्रातील दुसरे आर आर पाटील झाले असते असे सांगत कोठे म्हणाले, जे सपाटेंच्या पायात पाय घालत होते ते आता दुसऱ्या पक्षात गेलेत त्यामुळे आता सपाटेंचा मार्ग मोकळा झाला असे सांगून त्यांनी वानकर-सपाटे युतीचा एक प्रकारे नारा दिला.
कोठे यांच्या स्तुतीसुमनाने भावनिक झालेले सपाटे म्हणाले, राजकारणातील मित्र, शत्रू, आणि संघर्ष खरा नाही, आजचा संघर्ष उद्याचा मित्र होऊ शकतो. शरद पवारांच्या एका शब्दावर आपण महेश कोठें सोबतचे वैर विसरून आम्ही एक झालो आहोत. कदाचित माजी आमदारकी गेली तरी चालेल परंतु कोठे ना तिकीट मिळाले तर आपण त्यांच्यासाठी काम करू पक्ष मोठा करू असे अभिवाचन सपाटे यांनी दिले.


















