सोलापूर, दि. 3 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकसत्ता जिल्हा निर्देशांक 2022 पुरस्काराने आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना गौरविण्यात आले. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष राजीव करंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यावेळी उपस्थित होते.
दै. लोकसत्ताने प्रथमच जिल्हा निर्देशांक उपक्रम हाती घेतला. सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यानुसार सोलापूर जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकबाबत पहिला क्रमांक नोंदविला. या निर्देशांकाचे सादरीकरण यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
एका बाजूला टोकाची गरिबी आणि दुसरीकडे अमर्याद साधनसंपत्तीची उपलब्धता अशा असमानतेत राज्यातील जिल्हे विभागले गेले आहेत. त्यामुळे त्या सर्वाना एकाच मापात मोजणे अशक्य आणि अन्यायकारकही होते. त्यामुळे शेवटच्या ‘मानव्य विकास निर्देशांका’नुसार राज्यातील जिल्ह्यांची चार गटांत वर्गवारी करण्यात आली. त्यानंतर त्या-त्या गटातील जिल्ह्यांचे तौलनिक विश्लेषण करून प्रत्येक गटातील दोन असे एकूण आठ जिल्हे चांगल्या कामगिरीसाठी निवडले गेले. तसेच प्रगतीच्या फारशा सोयी-सुविधा नसतानाही, तळाला असूनही विविध परिमाणांत लक्षवेधी कामगिरी करणारा एक जिल्हा परीक्षकांनी निवडला. अशा एकूण नऊ जिल्हाप्रमुखांचा यावेळी फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ याचा आम्हालाही अभ्यासासाठी उपयोग होणार आहे. यामध्ये एखादा जिल्हा तळाला आहे त्याला वरती आणण्यासाठी आम्हाला विचार करता येईल. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाचे मी आभार मानतो. या डेटाच्या आधारे अनेक मुलभूत बदल आपण घडवू शकतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


















