सोलापूर : फेब्रुवारी पासूनच सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र थंड पेय मिळण्याची ठिकाण आणि पाणपोई पाहायला मिळत आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशावेळी त्यांच्यासाठी या रखरखत्या उन्हात प्यायला जर थंड पाणी मिळाले तर निश्चितच समाधान वाटेल.
याचा विचार करून लोकशासन पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे व मारुती जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या दर्शनी भागात जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या अभ्यासासाठी पाणपोईची सुविधा केली आहे. नागरिकांना या ठिकाणी जार मधील थंड पाणी प्यायला मिळत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते झाले त्यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
एकीकडे जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांची काळजी घेण्यात आली तर दुसरीकडे समोर असलेल्या उद्यानात अशा या उन्हाळ्यात पाण्यासाठी तडफडणाऱ्या मुक्या पक्षांना पाणी पिण्याची सुविधा करण्यात आली आहे. मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो.
या उपक्रमाचे उद्घाटन ही मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठा सेवा संघ पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या उद्यानात पक्षांसाठी पाण्याची सोय झाल्याने आता परिसरात निश्चितच पक्षांचे विविध आवाज ऐकायला मिळणार हे मात्र नक्की.