सोलापूर : काही महिन्यापूर्वी होम मैदानावर झालेले श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाने संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते. कारण ही त्याला तसेच होते. दीड टन वजनाच्या रेड्याचे आकर्षण तसेच कॅट शो आणि डॉग शो यामुळे सोलापूरकरांची पावले आपोआपच या प्रदर्शनाकडे वळली.
राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळे बंद झालेले कृषी प्रदर्शन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यंदाचे कृषी प्रदर्शन मात्र फेल गेल्याचे चित्र पाहायला मिळतं. सोलापूर शहराच्या बाहेर बाजूला असलेल्या लक्ष्मी विष्णू मिल कंपाउंडच्या मैदानात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्या प्रदर्शनाकडे जाण्यासाठी सोलापूरकरांची मानसिकता दिसत नाही. कृषी विभागाची जागेची निवड चुकल्याची चर्चा आता कृषी प्रदर्शनातील स्टॉलधारक करू लागले आहेत.
ज्या दिवशी म्हणजेच रविवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले त्या दिवशी दिवसभरात भेट देणाऱ्यांची संख्या केवळ 150 असल्याचं बाहेर ठेवलेल्या नोंद वहीवरून दिसून आलं. यंदा या कृषी प्रदर्शनाचे मार्केटिंग आणि प्रचार प्रसिद्धी करण्यात कृषी विभागाने कंजूसपणा केल्याचं पाहायला मिळालं आहे. जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, आत्म्याचे संचालक मदन मुकणे यांना नियोजन जमले नसल्याचे एकूणच प्रतिसाद पाहता चित्र आहे.

















