सोलापूर : राजस्थानच्या वाहनातून औरंगाबादकडे निघालेल्या गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नांदणी टोलनाक्याजवळ पकडला. या वाहनातून तब्बल 21 लाख 45 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप कुमार राऊत यांना 07 मार्च 2023 रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार त्यांनी कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व नंदिनी हिरेमठ यांना वाहन क्र. आर. जे. 19, जी. बी-5707 या वाहनाची तपासणी करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी यांनी नांदणी टोल नाका, मंद्रुप येथे वाहनाच्या तपासणीकामी थांबले असता त्यांना सायंकाळी 05.30 च्या सुमारास सदर वाहन विजापूर हायवेने येताना दिसला.
सदर वाहनास अन्न सुरक्षा अधिकारी यांनी थांबविण्याचा इशारा केल्यानंतर वाहन चालकाने वाहन बाजुला थांबविले. त्यानंतर सदर वाहनाची अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ सदृष्य वास येत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर वाहनामध्ये पानमसाला असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर वाहन चालकास मुद्देमालासह मंद्रुप पोलिस स्टेशन येथे आणले.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी पुढील कारवाई करत वाहन चालक सुमार आलम खान, रा. वडनावा जागेर, ता. पाचपट्टा, जि. बारमेर, राजस्थान व साथीदार रोशन शेरू खान, रा. कोडूला पारोदी, जि. बारमेर, राजस्थान तसेच यांच्याविरुध्द फिर्याद दाखल केलेली आहे.
सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ व प्रशांत कुचेकर तसेच नमुना सहाय्य्क श्रीशैल हिटनळ्ळी, विठ्ठल रहाटे यांच्या पथकाने पुर्ण केली.

















