सोलापूर : केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ आणि राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आगळ्यावेगळ्या पद्धतीने भजन आंदोलन करून लक्ष वेधले. यावेळी गॅस सिलेंडर रस्त्यावर आणून आणि बजेटमध्ये महाराष्ट्रातील जनतेचा झालेला अपेक्षाभंग याचा भोपळा फोडून निषेध करण्यात आला. मोदी सरकार आणि राज्यातील मिंधे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे म्हणाल्या, गॅसदरवाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाढलेल्या महागाईमुळे जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले बजेट म्हणजे केवळ घोषणांचा पाऊस आहे, शेतकऱ्यांसाठी वर्षाला 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली, त्यात महिन्याला फक्त 500 रुपये मिळतात त्यात महिन्याचा गॅस तर येतो का? त्यामुळे आम्ही हे निषेध आंदोलन केले आहे.
या आंदोलनात शहराध्यक्ष भारत जाधव, शहराध्यक्ष सुनीता रोटे, माजी महापौर नलिनी शिंदे, संगीता जोगदनकर, शशिकला कसपटे, माजी नगरसेविका रेखा सपाटे, तसलीम शेख, वाहिदाबी शेख, नसीमा शेतसंधी, सिया मुलाणी, सुनीता साठे, मनीषा माने, सुनीता गायकवाड, आशालता दीक्षित, ज्योती कांबळे, कुंदन कांबळे, गीता भोसले, सुनंदा पाटील, योगिता भालेकर, किरण मोहिते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.


















