सोलापूर : जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक, शासकीय निम शासकीय अशा सर्वच कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपाची आक्रमकता मंगळवारी पहिल्याच दिवशी या कर्मचाऱ्यांनी दाखवून दिली. जी कार्यालय रोज माणसांनी भरून जायचे तीच कार्यालय मंगळवारी सामसूम पाहायला मिळाली.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये केवळ अधिकारी आपल्या केबिनमध्ये बसून होते. एकही कर्मचारी नव्हता या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद बांधकाम क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी दिवसभराचं निर्मनुष्य वातावरण पाहून आपल्या विभागातील तब्बल 27 कर्मचाऱ्यांना एक खरमरीत पत्र लिहिले. त्या पत्राची प्रत कुलकर्णी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन यांना दिली आहे.
त्या पत्रामध्ये 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलनाबाबत करावयाची कार्यवाही… एक विनंती असा विषय होता.
त्यांनी या पत्राला शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेतला आहे, तसेच त्या परिपत्रकाचा संदर्भ देत त्यांनी या पत्रात म्हटले की, एक विभाग प्रमुख म्हणून मी खालील बाबी आपल्या निदर्शनास आणत आहे.
1. ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
2. आपण संपात सहभागी न होता नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहावे, ही विनंती. तसेच आपल्या कामामुळे शासनाची कामे विहित वेळेत पार पडतील हे अपेक्षा.
3. रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर हजर होणे ही विनंती.
4. संपाबाबत केंद्र शासनाचे काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य शासन ही अनुसरणार आहे याची नोंद घ्यावी.



















