सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील 18 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. गुरुवारी संपाचा तिसरा दिवस होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सोलापुरातील माजी आमदार आडम मास्तर यांनी पहिल्या दिवसापासून या संपला पाठिंबा दिला आहे. गुरुवारी त्यांनी आपल्या पेन्शन मधील एक लाख एक रुपये कर्मचारी समन्वय समितीला सुपूर्द केले.
हे एक लाख रुपये देण्यामागील भूमिका स्पष्ट करताना आडम मास्तर म्हणाले, जुनी पेन्शन मिळण्याचा हा लढा आहे, तो लढा यशस्वी होण्यासाठी अनेक दिवस लागू शकते यासाठी खर्च मोठा आहे. भविष्यात हा लढा आणखी चालू राहिला तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अडचणी होतील त्यांच्यासाठीही मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे याचा विचार करून मी आपल्या पेन्शन मधील एक लाख रुपये समन्वय समितीकडे दिले आहेत असे सांगत ते पुढे म्हणाले, राज्यातील माजी आमदारांची पेन्शन रद्द करा, विद्यमान आमदारांच्या पगारी मध्ये 50 टक्के कपात करून या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करा अशी भूमिका त्यांनी मांडली.

















