सोलापूर : राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरातील प्रशासकीय कामकाज सलग चौथ्या दिवशीही ठप्प राहिले आहे. संपामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही वेठीस धरली गेल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत तर दुसरीकडे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ही संपात सहभागी झाल्याने शाळांवर सुद्धा परिणाम होत आहे. त्यामुळे शाळा बंद झाल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे.
संपामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर पहिल्या एक-दोन दिवसांपर्यंत परिणाम झाल्याचे दिसून आले नव्हते परंतु आता संपाच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम जाणवत आहे.
केवळ जिल्हा परिषदेमध्ये विभाग प्रमुख उपस्थित असून सोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी व इतर विभाग प्रमुख जिल्हा परिषदेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आधारे कामकाज चालवीत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर ऑनलाइन होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत अंतर्गत असलेल्या आरोग्य विभाग शिक्षण विभाग आणि पाणीपुरवठा विभाग या तिन्ही विभागप्रमुखांच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य आणि पाणीपुरवठा याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ असल्याने त्यांच्या शैक्षणिक अडचणी येऊ नये, परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात याबाबत सूचना कराव्यात तसेच सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच सोलापुरात देखील कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे आरोग्य विभागानेही कर्मचारी संपात असले तरी नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना केल्याचे सीईओ संदीप कोहिणकर यांनी सांगितले.

















